केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

पुणे : जैवइंधनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे पुण्यासह मुंबई, नवी मुंबई आणि गुवाहाटी या शहरांना मिथेनॉलवर चालणाऱ्या प्रत्येकी दहा बस देण्यात येणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली. पेट्रोल आणि डिझेल या खर्चिक आणि प्रदूषण करणाऱ्या इंधनांचा वापर कमी करत भारतीय अर्थव्यवस्था इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल यांसारख्या पर्यायी इंधनांवर प्रगत व्हावी यासाठी ठोस प्रयत्न आणि कृती करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (एआरएआय) आयोजित ‘सिम्पोजियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजी २०१९’ या परिषदेत ‘गतिमानतेचे सशक्तीकरण‘ या विषयावर गडकरी बोलत होते.  नीती आयोगाच्या मिथेनॉल संबंधी समितीचे प्रशांत गुरू श्रीनिवास, द एनर्जी अँड  रिसोर्सेस इन्स्टिटय़ूटचे  महासंचालक डॉ. अजय माथूर, एआरएआयच्या संचालक रश्मी उध्र्वरेषे, परिषदेचे समन्वयक ए. बादूशा या वेळी उपस्थित होते. देशात मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये १५ टक्के मिथेनॉल मिसळण्याच्या शक्यतेची पडताळणी करण्याच्या कार्यक्रमाचा गडकरी यांनी शुभारंभ केला. एआरएआयमध्ये मिथेनॉल विषयक संशोधनासाठी रस्ते वाहतूक खात्याच्या निधीतून एक प्रगत संशोधन केंद्र (सेंटर ऑफ एक्सलन्स ) सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली.

गडकरी म्हणाले, की मिथेनॉल उत्पादनासाठी आवश्यक कच्चा माल देशात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. कोळशाच्या राखेपासून, भाताच्या तसेच अन्य पिकांच्या ताटांपासून आणि जंगलात उपलब्ध असलेल्या अनेक वनस्पतींपासून मिथेनॉलची निर्मिती करता येईल. गडचिरोली जिल्हा जैवइंधन जिल्हा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. मिथेनॉल इंधन वापरणाऱ्या वाहनाचा प्रति किलोमीटर खर्च खूपच कमी आहे. देशात शेती क्षेत्रात अतिरिक्त उत्पादन होत असताना अशा उत्पादनाचा वापर इथेनॉल, मिथेनॉल, बायो डिझेल अशा पर्यायी इंधनाची निर्मिती करण्यासाठी केला पाहिजे.