२५ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार; प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्याची जलसंपदा विभागाकडे विनंती

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (महाराष्ट्र वॉटर र्सिोसेस रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी – एमडब्लूआरआरए) आदेशांची अंमलबजावणी करण्याबाबत महापालिकेकडून एक आठवडय़ाची मुदत मागण्यात आली आहे. तसेच येत्या २५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या विषयासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, बैठक होईपर्यंत प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्याची विनंती महापालिकेने जलसंपदा विभागाला केली असून, ती मान्य करण्यात आली आहे.

पर्वती जलकेंद्राला पाणीपुरवठा करणारे महापालिकेचे दोन पंप बंद करण्याची कारवाई बुधवारी जलसंपदा विभागाकडून करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर जलसंपदा विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी दुपारी पार पडली. बैठकीतील चर्चेची माहिती देताना खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार म्हणाले, २५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर बैठक होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तोपर्यंत प्रतिदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी देण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबत लेखी पत्र देण्याचे आयुक्त सौरभ राव यांना सांगण्यात आले आहे. २५ जानेवारीनंतरही महापालिकेकडून जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशांची कार्यवाही न झाल्यास जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेनुसार कार्यवाही करू. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश जलसंपदा विभागाला लेखी मिळाले, तरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

महापालिकेकडून पाण्यात कपात करण्यात येत नसल्याने उन्हाळ्यात ग्रामीण भागाला पाणी देताना अडचणी येणार आहेत, असेही बैठकीत सांगण्यात आले. दरम्यान, जलसंपदा विभागाने पर्वती केंद्राला पाणीपुरवठा करणारे बंद केलेले दोन पंप बैठकीनंतर महापालिकेकडून गुरुवारी पुन्हा सुरू करण्यात आले.

सिंचन भवनात मनसेकडून तोडफोड

जलसंपदा विभाग शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दहा-बारा कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी मंगळवार पेठेतील सिंचन भवन येथील जलसंपदा विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांची तोडफोड केली. त्यामुळे सिंचन भवनात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. काही वेळातच समर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सिंचन भवनातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांकडे देण्यात आले असून, तक्रारही देण्यात आली आहे. त्याआधारे मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.