न्यूड फोटो व्हायरल झालेल्या 'त्या' महिला यष्टिरक्षकाची निवृत्ती

इंग्लंडची दिग्गज यष्टिरक्षक सारा टेलरने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंडच्या या खेळाडूची ओळख ही कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीपेक्षा जलद स्टम्पिंग करणारी यष्टिरक्षक म्हणून आहे.

30 वर्षीय सारा मागील तीन वर्षांपासून आपल्या प्रकृती स्वास्थ्यावरून हैराण आहे. त्यामुळेच तिनं 13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला रामराम करण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडच्या महिला संघाने 2009 आणि 2017मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला आणि सारा त्या विश्वविजेत्या संघांची सदस्य होती.

2014साली आयसीसीनं वर्षातील सर्वोत्तम वन डे महिला क्रिकेटपटू म्हणून सारा टेलरला गौरविले होते. याशिवाय तिने तीनवेळा ( 2012, 2013 आणि 2018) ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला आहे.

तिनं इंग्लंडकडून 10 कसोटी सामन्यांत 300 धावा केल्या आहेत आणि तिच्या नावावर 18 झेल व 2 स्टम्पिंग आहेत.

वन डे क्रिकेटमध्ये तिनं 126 सामन्यांत सात शतकांच्या मदतीनं 4056 धावा केल्या आहेत. यष्टिंमागेही तिनं 87 झेल व 51 स्टम्पिंग केले आहेत. 90 ट्वेंटी-20 सामन्यांत तिनं 2177 धावा केल्या, तर 23 झेल व 51 स्टम्पिंग्स केले.

ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करणाऱ्या क्रिकेटपटूंत सारा टेलरने कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीलाही मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.

सारानं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 51 स्टम्पिंग केले आहेत. धोनीच्या नावावर 34 स्टम्पिंग आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटूंत सारा टेलर 6533 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. महिला क्रिकेटपटूंत सर्वाधिक 232 फलंदाजांना माघारी पाठवण्यात सारा टेलर अव्वल स्थानी आहे

नुकतेच सारानं एक न्यूड फोटोशूट केले होते आणि त्यामुळे तिची फार चर्चा झाली होती.