धक्कादायक…! हेअर ट्रान्सप्लांटनंतर उद्योजकाचा मृत्यू 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टक्कल पडणे ही आजकालची मोठी समस्या बनली आहे. त्यावर अत्याधुनिक उपाय म्हणून हेअर ट्रान्सप्लांट थेरपी घेतली जाते. पण मुंबईतील एका तरुण उद्योजकाचा हेअर ट्रान्सप्लांट नंतर मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. श्रावण कुमार चौधरी (४३) असे या तरुणाचे नाव आहे. हेअर ट्रान्सप्लांट नंतर ५० तासांनी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. श्रावण हा मुंबईत साकीनाका येथील रहिवासी आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, श्रावण कुमार चौधरी यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. तसेच चेहऱ्यावर आणि घशाला सूज देखील आली होती त्यामुळे त्यांना शुक्रवारी पवईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपाचारादरम्यान जीवघेण्या अशा ‘अॅनाफायलॅक्सिस’ या अॅलर्जीमुळंच चौधरींचा मृत्यू झाल्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली. चौधरी यांचा शनिवारी सकाळी पावणे ७ च्या सुमारास मृत्यू झाला. त्यापूर्वी चौधरी यांनी १५ तासांपेक्षा अधिक काळ चालणाऱ्या परक्रियेदरम्यान जवळपास ९५०० केसांचे प्रत्यारोपण करून घेतले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर झालेल्या जीवघेण्या अॅलर्जीमुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. मात्र श्रावण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे पोस्टमार्टम झाल्यावरच समोर येईल असे देखील सांगण्यात आले आहे.