☆ विविधा ☆ ?️ गणपती बाप्पा मोरया …. ?️☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

गणपती बाप्पा मोरया….

मोरया… चा जयघोष करत ढोल, ताशे, झांज, लेझीम च्या गजरात आगमन व्हायचे आमच्या गल्लीतल्या बाप्पाचे. पालखीत बसून सोवळ्यांने, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत आगमन होत असे ह्या विघ्नहर्त्याचे. आम्ही सगळी मुलं त्या पालखी मागून चालत गणरायाला आणायला जात असू. गणपती बाप्पाचे

आगमन एका देवळात होत असे जिथे तो पुढे अकरा दिवस विराजमान होत असे. दररोज दोन वेळा, वेळेवर आरती होत असे आणि ती सर्वांनाच पाठ असल्यामुळे ती एका सुरात आणि एकाच लईतही होत असे.

आम्ही जसा गल्लीतला तसाच घरचा गणपती आणायला सुद्धा दर वर्षी बाबांबरोबर जात असू. आमची मूर्ती ठरलेली असायची. मध्यम आकाराची, पिवळे पीतांबर आणि केशरी शेला परिधान केलेली ,हिरे जडीत मुकुट असलेली, सुंदर बोलके डोळे आणि चेहर्‍यावर शांत, शीतल, तृप्त असे भाव, एका हातात मोदक आणि दुसर्‍या हातात कमळ. बरोबर मुषक हवेतच. मूर्ती बघून मनं कसं प्रसन्न होतं असे.

घरी आई आरतीचे ताम्हन घेऊन वाट पहात असायची ह्या एकदंताची. आम्ही पोहोचताच तिच्या चेहर्‍यावरचा भाव अगदी पाहण्या सारखा असायचा. प्रसन्न मनाने ती बाप्पाला ओवाळायची आणि आमचे बाप्पा विराजमान व्हायचे आम्ही त्यांच्या साठी केलेल्या खास आसनावर.

हे दिवस मात्र आमच्यासाठी खास असायचे कारण एक तर गणपती बाप्पा असे पर्यंत आईचा मूड एकदम झकास असायचा आणि रोज गोडाधोडाचे खायला मिळायचे. त्यात उकडीचे मोदक म्हणजे आहाहा.. बाप्पाला आणि आम्हालाही परम प्रिय. न चुकता आरती, अभिषेक, नैवेद्य अथर्वशीर्षाचे पठण व्हायचे. एकूणच वातावरण प्रसन्न आणि अल्हाददायक असायचे. पाचवे दिवशी घरी गौर यायची. त्या दिवशी आई खूप खुश असायची जणू तिचीच लेक आली आहे माहेरी. माहेरवाशीणी साठी पुरण पोळी ठरलेली.

हे अकरा दिवस कसे भुर्रकन उडून जायचे. आणि बघता बघता बाप्पाला निरोप द्यायचा दिवस यायचा. आमचा नावडता दिवसं त्या दिवशी सगळेच उदास असायचे. हा पाहुणा आपल्या घरी आता परत जाणार म्हणून खूप वाईट वाटायचे. आज आरती विशेष व्हायची. आईचे नेत्र भरून यायचे.पण काय करणार काहीच इलाज नसायचा. शेवटच्या दिवशी आम्ही सगळे देखावे बघायला जायचो. इतके सुंदर सुंदर देखावे असायचे आणि अनंत चतुर्दशी दिवशी भव्य मिरवणुका असायच्या. रात्रभर आम्ही मिरवणुका बघायचो आणि पहाटे परत यायचो.

आज मिरवणूक पहायला गेले होते गणपतीची आणि आनंद होण्या ऐवजी दुःखच झाले. समोरचं दृश्य पाहून कळेच ना नक्की कशाची मिरवणूक आहे ते. भक्तीगीतं भावगीतं कानी पडायच्या ऐवजी फास्ट ट्रॅक च्या गाण्यावर, धांगडधींगा चालू होता. दारूच्या नशेत बेधुंद होऊन गणपती बाप्पा समोर तरुण पिढी नाचताना पाहून खूप दुःख झाले. त्यांची त्यांनाही शुद्ध नव्हती. चुरमुऱ्यांची उधळण करत ती पायदळी तुडवत मिरवणूक चालली होती.

ते कमी म्हणून फटाकड्यांच्या धुराने सगळे वातावरण दूषित केले होते. मला प्रश्न पडला त्या विघ्नहर्त्याला तरी श्वास घेता येत असेल का ह्या धुरात?? ते दूषित वातावरण आणि कर्ण बधीर करणारा तो बॅंजो चा आवाज ऐकून परत यावं असं वाटत तरी असेल का त्या गणरायाला ?

टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना राबविली होती ती समाजाला संघटीत करण्याच्या उद्देशाने. आज त्यांनी जर हे अस दृश्य पाहिलं असत तर बहुतेक बेधुंद होऊन नाचणार्‍यांच्याच कंबरेतला पट्टा काढून चांगलं फोडून काढलं असत एकेकाला.

मित्रांनो जरा विचार करा आपण बदलू शकू का हे दृश्य?? राजकारणी लोकं आपलं पद आणि पैसा दाखवण्यासाठी एका गल्लीत तीन तीन गणपती बसवतात. नाही नाही तितकी श्रध्दा आहे म्हणून नव्हे तर माझा मंडप तुझ्या पेक्षा भारी हे दाखवण्यासाठी. मी किती किलोचे चांदीचे दागिने केले आहेत ह्या वर्षी ह्यासाठी,सत्तेसाठी.

आपण सगळे जर एकत्र आलो तर हे नक्की थांबवू शकू. एका गल्लीत एकच गणपती निदान एवढी तरी सुरवात करू शकू. बँजो वर नाचण्या ऐवजी सनई चौघडे, लेझीम आणि ढोलाच्या ठेक्यात बाप्पाला निरोप देऊ शकू. नशेत बेधुंद न होता भक्तीत तल्लीन होऊ शकू. चुरमुऱ्यांची उधळण करण्या पेक्षा तेच गोरगरिबांना वाटू शकू.

असं काही तरी करू की आपल्या पेक्षा जास्त गणराया वाट बघेल पुढच्या वर्षी येण्याची.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ?

गणपती बाप्पा मोरया…

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments