भरमसाठ विद्युत बिलांमुळे नागरिकांमध्ये महावितरणविरोधात तीव्र असंतोष

महावितरणच्या कार्यालयावर मनसेची धडक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • कल्याण, २३ जून २०२०

कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली असतानाच आता महावितरणने विद्युत वापरासाठी नागरिकांना मोठी बिले पाठविल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांच्या या संतापाचा उद्रेक होवून मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या कार्यालयावर धडक मारून अधिकाऱ्यांना जाब विचारला.

या शिष्टमंडळामध्ये मनसे सरचिटणीस व माजी आमदार प्रकाश भोईर,माजी नगरसेवक पवन भोसले, माथाडी कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस राजन शितोळे,विध्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष विनोद केणे,उपशहर अध्यक्ष गणेश चौधरी, सचिन पोपलाईट,जिल्हाध्यक्षा स्वाती कदम,नयना भोईर,जिल्हा सचिव वासंती जाधव,शहर अध्यक्षा शीतल विखणकर, नगरसेविका तृप्ती भोईर,उपशहर अध्यक्षा गीता काट्रप तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाने गेल्या ३ महिन्यांपासून टाळेबंदी जाहीर केल्याने सर्वसामान्य नागरिकांना आपल्या कार्यालयात जाता आले नाही तसेच कोणताही कामधंदा करू शकले,परिणामी अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली,अशातच महावितरणने बिलाची रक्कम भरमसाठ पाठवून ग्राहकांना शॉक दिला आहे.

महावितरणच्या या शॉकच्या मनमानी कारभाराविरोधात मनसेने जोर का झटका देत कार्यालयावर धडक देऊन वीज बिल कमी करण्यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांना निवेदन  देण्यात आले आहे.महावितरणने आपला कारभार असाच मनमानी सुरू ठेऊन ग्राहकांची पिळवणूक केली तर मनसे यापेक्षाही मोठे आंदोलन हाती घेईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

मनसेच्या शिष्टमंडळाशी बोलताना कार्यकारी अभियंता राठोड व कट्टा यांनी ग्राहकांना चुकीची व वाढीव वीज बिल गेल्याने त्यामध्ये दुरुस्ती करून देण्यात येतील असे आश्वासन दिल्याची माहिती मनसेच्या शिष्टमंडळातर्फे देण्यात आली.

======================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा