मी कोणाची गोष्ट सांगणार आहे? आणि कुठल्यातरी काळातली गोष्ट आज कशी सांगणार आहे? या दोन्ही प्रश्नांना किरण नगरकर लेखक म्हणून भिडले..

लहान मुले गोष्टी ऐकता ऐकता झोपी जातात. मग थेट उतारवयात पुन्हा कथाकीर्तनांत जीव रमवावासा वाटतो. तेव्हा कथेकरीबुवा तमाम मर्त्य मानवांना सन्मार्गावर नेण्याच्या ईर्षेने कथा सांगत असतात. तात्पर्य असे की, गोष्ट माणसांना झोपवण्यासाठी आहे की जागे करण्यासाठी, हे समोरची माणसे कोण यावर ठरवावे! पण असेच का करायचे? गोष्ट फक्त जागे करण्यासाठी किंवा झोपवण्यासाठीच कशाला सांगायची? ऐकणाऱ्याला गुंतवून-गुंगवून टाकणे किंवा वाचक/श्रोत्यांचे पुरेसे रंजन करून त्यांना शहाणे करणे, या दुभागणीत आपली गोष्ट कुठे आहे, एवढेच का म्हणून ठरवायचे? हे प्रश्न आजचे नाहीत. आधुनिक साहित्यकारांना ते वेळोवेळी पडलेले आहेतच. त्यांपैकी प्रत्येकाने ते आपापल्या परीने सोडवलेलेही आहेत. ‘स्वत:साठी लिहायचे’ असे हे सारे आधुनिक साहित्यकार म्हणत असतात खरे; पण का लिहायचे, कुणासाठी लिहायचे, हे प्रश्न पाडून घ्यावेच लागतात आणि त्यांची उत्तरेही स्वत:लाच शोधावी लागतात. किरण नगरकरांनी स्वत:ला पाडून घेतलेला पहिलाच प्रश्न होता : मी कोणाची गोष्ट सांगणार आहे?

‘सात सक्कं त्रेचाळीस’ ही कादंबरी, हे त्या प्रश्नाचे उत्तर. या कादंबरीतील गोष्ट एकटय़ा कुशंकची नाही. त्याच्या मैत्रिणीचीही नाही. त्या दोघांची तर नाहीच नाही. ती अनेक माणसांची गोष्ट आहे आणि त्याहीपेक्षा अस्थैर्य, घुसमट, लैंगिकता हे सारे या माणसांवर कसे परिणाम करते, याचीही गोष्ट आहे. ‘मराठीला न झेपलेला लेखक’ असे नगरकरांचे वर्णन त्यांची मृत्युवार्ता देताना ‘लोकसत्ता’ने केले आहे. त्या न झेपण्याची सुरुवात पहिल्याच कादंबरीपासून झाली. खरे तर तिथेच ती संपणे नैसर्गिक. कारण नगरकरांनी पुन्हा मराठीत लिहिलेच नाही. पण नगरकर मराठीत येत राहिले. बहुतेकदा रेखा सबनीस यांनी त्यांच्या लिखाणाचे अनुवाद उत्तमपणे केले. ‘ककल्ड’ ही साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी मराठीत आली, तेव्हा नगरकर वाचकांहाती दिसू लागले. मात्र, त्याआधीच मराठीत आलेली ‘रावण आणि एडी’  मराठीला झेपली नाही म्हणजे नाहीच. इतकी नाही की, रावण पवार आणि एडी कुटिन्हो या- एकाच सीडब्ल्यूडी चाळीत राहणाऱ्या दोघांची आयुष्ये पुढे जात राहिली, त्यावर ‘द एक्स्ट्राज’ आणि ‘रेस्ट इन पीस’ या दोन कादंबऱ्या लिहिल्या जाऊन किरण नगरकरांचे कादंबरीत्रय पूर्ण झाले; याची गंधवार्ता मराठी वाचकाला असण्याचे कारण नव्हते. या त्रिधारेतील कादंबऱ्या बदलत्या मुंबईचे आयुष्य कसे टिपतात आणि माहिती देण्यात न रमतादेखील मुंबईविषयी वाचकाची जाणीव कशी फुलवतात, याविषयी रकानेभरून कौतुक झाले, ते सारे इंग्रजीत. हिंदी सिनेसृष्टीत नाव कमावण्याचा आशावाद आणि वाढती गुंडगिरी ही तत्कालीन मुंबईची दोन व्यवच्छेदक वैशिष्टय़े या त्रयीत जितकी दिसतात, तितकी कुठेही दिसत नाहीत. मराठीत तर नाहीच नाही.

मात्र, याच वेळी नगरकर आणखीही काही करीत होते. म्हणजे अरुण कोलटकरांच्या बरोबरीने केलेली जाहिरात संस्थांची कामे नव्हे. जाहिरातींच्या जगात इंग्रजी कॉपीरायटर म्हणून त्यांनी उत्तम काम केलेच. पण साहित्यकार म्हणून, मुंबई एके मुंबई न करता नगरकर हे मिथकांचे पुनर्कथन करण्याचेही काम करू लागले होते. ‘बेडटाइम स्टोरी’ हे सत्तरच्या दशकाच्या मध्यावर लिहिलेले नाटक महाभारतातील काही पात्रे आणि प्रसंग पुन्हा नव्याने, नव्या जाणिवांनिशी मांडते. द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनवून त्यास गुरू मानणारा एकलव्य हा ‘बेडटाइम स्टोरी’त द्रोणाचार्य त्याला अंगठा मागतात तेव्हा- ‘गुरू मातीचे, अंगठाही मातीचाच’ हा जशास तसा न्याय लावतो. अशा प्रसंगांतून वाचकापर्यंत पोहोचतो तो ‘कोणाची गोष्ट सांगणार?’ या प्रश्नासह नगरकर ज्याला भिडले असा दुसरा प्रश्न : कुठल्या तरी काळातली गोष्ट मी आज कशी सांगणार?

याची वेगवेगळी उत्तरे नगरकरांच्या दोन कादंबऱ्यांत सापडतील. पैकी पहिली ‘ककल्ड’. यात मीरेचा पती, श्रीकृष्णाने आपल्या पत्नीला इतके कसे नादी लावले म्हणून वेडापिसा होऊन स्वत:ला निळ्या रंगात रंगवून घेतो. म्हणजे आशयद्रव्याऐवजी रूपाशी स्पर्धा करतो. हे अनेक वाचकांना आठवत असेल. नसले, तरी हा एक प्रसंग सुचल्यावर अख्खी जाडजूड कादंबरी लिहिण्यास आपण प्रवृत्त झाल्याची आठवण नगरकरांनी अनेक मुलाखतींत सांगितली आहे. महत्त्वाचे हे की, मीरेच्या काळाशी प्रामाणिक राहूनही बरेच कल्पित भाग नगरकरांनी ‘ककल्ड’ या कादंबरीत बेमालूम विणले. मात्र अगदी ताज्या, ‘द आर्सनिस्ट’ या कबीराच्या जीवनमूल्यांवर आधारलेल्या कादंबरीत त्यांनी कबीराला आजच्या काळातच आणले. वर ही कादंबरी संपल्यानंतरच्या अंतभाषणात ‘मुल्ला, साध्वी, योगी आणि सारेच भेदवादी हे तिरस्कार, हिंसा यांच्या आगी भडकावत असताना आपण कबीर काय नुसता गातच राहायचा? आचरणात नाही आणायचा?’ असा थेट प्रश्नही वाचकांना विचारला.

नगरकर हे कथेकरीबुवा नव्हते. लेकराला झोप येईपर्यंत गोष्ट सांगणारे प्रेमळ बापही नव्हते. कबीर आळवताना त्यांना शहाणिवेचा सूर सापडला खरा; पण अशा फक्त एखाद्याच मूल्याचा उद्घोष करणारेही ते नव्हतेच. कुशंक ते कबीर या साहित्यिक प्रवासात त्यांनी अनेक दुविधांना, अनेक द्वंद्वांना अंगावर येऊ दिले. स्वत:च्याच नव्हे, वाचकांच्याही. त्यांच्या ‘सात सक्कं त्रेचाळीस’मधला एक प्रसंग अनेक वाचकांना आठवत असेल : गेंडा आला की झाडाखाली गुमान बसायचे- गेंडा गुर्मीत धावत येतो आणि झाडाला त्याचे शिंग अडकते- असे त्या प्रसंगात कुणीसे इतरांना सांगते. गेंडय़ाला प्रत्यक्षात दोन शिंगे असतात. एक लहान, बोथट आणि दुसरे मारक. संकल्पनांच्या द्वंद्वामध्ये कुठले शिंग आत्ता मारक ठरते आहे, हे नगरकरांना बरोबर कळे. मग ते शिंग रुतून राहावे, यासाठी गोष्टीचे झाडही नगरकरच वाढवत. या झाडाचे आशयद्रव्य मजबूत. समीक्षक खोडाला खरवडत, चीक फार आहे म्हणून बाजूला होत. मग नगरकर काही मुलाखतींमधून, विशेषत: मराठी समीक्षकांना शिंगावर घेऊ पाहात.

हे सारे आता नगरकरांसोबत संपले. बेचाळीस सालचा जन्म, स्वातंत्र्याच्या पन्नाशीत लिहिलेल्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार, पण पुढे भारतीयांना ज्याचे महत्त्वच फारसे लक्षात आले नाही असा ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा जर्मन मान, हा नगरकरांच्या आयुष्याचा नकाशा उरला. त्याला कुणी द्वंद्वनगरचा नकाशा म्हणेल. जरूर म्हणावे. वसाहतवाद की देशीवाद, वास्तव की मिथक, कुटुंब की मूल्ये, ऊर्मी की तत्त्वनिष्ठा अशी सारी द्वंद्वे दोन हातांच्या बोटांवर मोजण्याइतपत पुस्तकांतून हाताळणाऱ्या एकाच आयुष्याला काय म्हणावे? द्वंद्वांचा विचित्र दुखरा फटकादेखील स्त्रियांची आयुष्ये साहित्यात नेहमी सन्मानानेच आणणाऱ्या नगरकरांनी उत्तरायुष्यात ‘#मीटू’च्या वादळामुळे शांतपणे सोसला.

ते आयुष्य आता संपले. उरला द्वंद्वनगरचा नकाशा. त्यावरल्या त्या सन्मानखुणांसह. त्यावरून आपण कबीर होऊन चालायला हवे.. गेंडा आला, तर आधारवड आहेतच.. गेंडय़ाच्या गुर्मीविषयी सावध करणाऱ्या किरण नगरकर यांनीच ते रुजवून ठेवले आहेत.